अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या महान जैन तीर्थंकरांना कायदेशीर खटल्यांमध्ये का वेठीस धरताय?” – न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला

राजस्थानमधील ऐतिहासिक व सुप्रसिद्ध अतिशय क्षेत्र श्री महावीरजी मंदिराच्या व्यवस्थापनावरून जैन समाजातील श्वेतांबर आणि दिगंबर पंथांमध्ये सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी पूर्ण करून आपला निकाल राखीव ठेवला आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असून, न्यायालयाने दोन्ही बाजूंना पुढील आठ दिवसांत आपापले लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान खंडपीठाने या वादावर अत्यंत परखड आणि मार्मिक टिप्पणी केली. धर्म आणि श्रद्धा हा संवेदनशील विषय असल्याचे नमूद करत न्यायमूर्ती पारडीवाला म्हणाले की, ज्या प्रभूंच्या नावावर हा वाद सुरू आहे, त्यांच्यासाठी सकाळी श्वेतांबर परंपरेनुसार पूजा आणि संध्याकाळी दिगंबर परंपरेनुसार वस्त्र बदलून पूजा करावी अशी अपेक्षा आहे का? या पृथ्वीतलावर अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या महान संताला अशा नाहक कायदेशीर खटल्यांमध्ये का वेठीस धरले जात आहे, याने भगवान महावीर प्रसन्न होणार आहेत का, असा थेट सवाल न्यायालयाने केला. तसेच अशा वादांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहनही न्यायालयाने केले.
या प्रकरणात याचिकाकर्त्या दिगंबर समितीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर्यमा सुंदरम यांनी युक्तिवाद केला. मंदिराचे व्यवस्थापन, मूर्ती आणि मालमत्ता ऐतिहासिक काळापासून दिगंबर समाजाच्या नियंत्रणात असल्याचे सांगत, पूजास्थळ (विशेष तरतुदी) कायदा १९९१ च्या कलम ४ अन्वये कनिष्ठ न्यायालयाने आधीच कारवाई रद्दबातल ठरवली होती, त्यामुळे उच्च न्यायालयाने अपील ऐकायला नको होते, असा मुद्दा त्यांनी मांडला. याउलट प्रतिवादी श्वेतांबर पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्याम दिवाण यांनी बाजू मांडताना स्पष्ट केले की, हा वाद कोणत्याही पूजास्थळाचे मूळ स्वरूप बदलण्यासाठी नसून, संपूर्ण जैन समाजाच्या हितासाठी मंदिराचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी आहे; त्यामुळे १९९१ चा कायदा येथे आडवा येत नाही. भविष्यात व्यवस्थापन मिळाले तरी मूळ पूजा पद्धती आणि विधी बदलणार नाहीत अशी हमी देणार का, या न्यायालयाच्या प्रश्नावर दिवाण यांनी पूजा पद्धतींमध्ये परंपरेनुसार भिन्नता असू शकते, असे नमूद केले.
या संपूर्ण घडामोडींवर आपली प्रतिक्रिया नोंदवताना कायदेतज्ज्ञ ॲड. महेश धन्नावत म्हणाले की, भगवान महावीरांचे संपूर्ण जीवन हे ‘अहिंसा परमो धर्म’ आणि ‘अनेकांतवाद’ या मूल्यांवर आधारलेले आहे; त्यामुळे ज्या महापुरुषांनी जगाला त्याग, शांती आणि समन्वयाचा मार्ग दाखवला, त्यांच्याच मंदिराच्या व्यवस्थापनावरून दोन पंथांनी न्यायालयाच्या पायऱ्या चढणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. कायदेशीर प्रक्रिया तिच्या नियमांनुसार पुढे जाईलच, परंतु सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे. व्यवस्थापन कोणाचेही असो, तीर्थक्षेत्राचे पावित्र्य, परंपरा आणि समाजातील बंधुभाव टिकून राहणे हीच काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भगवान महावीर स्वामी यांच्या पावन चरणी हीच प्रार्थना आहे की, या वादावर लवकरच योग्य न्यायनिवाडा व्हावा आणि श्वेतांबर-दिगंबर पंथांमधील हा तिढा कायमस्वरूपी व सामोपचाराने सुटावा, जेणेकरून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आणि जैन समाजातील एकात्मता सदैव अबाधित राहील.

