जालना : जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, तर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सातत्याने मेहनत करणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. जीवन ऑटो मोडवर जगण्याऐवजी कृतज्ञतेच्या भावनेतून स्वतःचे जीवन स्वतः घडवा, असा प्रेरणादायी संदेश जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जालन्यात आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जीवनातील छोट्या-छोट्या निर्णयांचे दीर्घकालीन महत्त्व अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या की, आज सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा की नाही, हा निर्णय वरकरणी अगदी छोटा वाटू शकतो. आज अभ्यास केला नाही तर काय फरक पडणार, असेही वाटू शकते. मात्र, आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे परिणाम भविष्यात दिसून येतात. आजचे छोटे प्रयत्नच उद्याच्या मोठ्या यशाचा पाया घालतात.
प्रत्येक व्यक्तीच्या मनात दोन प्रकारचे आवाज असतात. एक आवाज सांगतो, ‘आज नको, उद्या करू, अजून खूप वेळ आहे’; तर दुसरा आवाज सांगतो, ‘आत्ताच उठा, कामाला लागा आणि आजच सुरुवात करा.’ आपण या दोन्हीपैकी कोणत्या आवाजाचे ऐकतो, यावर आपले दीर्घकालीन भविष्य अवलंबून असते. त्यामुळे मनातील सकारात्मक आणि कृती करण्यास प्रेरित करणाऱ्या आवाजाचे ऐका, असे त्यांनी सांगितले.
स्वप्न पाहा, मेहनत करा; शॉर्टकटला पर्याय नाही!
विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, आपल्या जीवनात मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करा. स्वप्न आणि मेहनत यांची योग्य सांगड घातली तर आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यशासाठी मेहनतीला कोणताही पर्याय नाही. There is no shortcut. आज आपण ज्या यशस्वी व्यक्तींच्या कथा पाहतो, त्यांच्या यशामागे अनेक वर्षांची मेहनत, सातत्य आणि समर्पण असते.
आज केलेल्या प्रयत्नांचे परिणाम कदाचित लगेच दिसणार नाहीत; परंतु पाच वर्षांनंतर मागे वळून पाहताना त्या मेहनतीचे खरे मूल्य आणि परिणाम लक्षात येतील. त्यामुळे प्रत्येक दिवस स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या कामात संपूर्ण आत्मा ओता!
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिथे जाल तिथे स्वतःचे शंभर टक्के योगदान द्या, कोणतीही संधी अर्धवट सोडू नका, असा संदेश देताना त्यांनी इंग्रजीत सांगितले, “Pour your soul into the work you do. Pour everything you have into the work you do.”
आपण एखादे काम पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणे करतो, तेव्हा ईश्वरही आपली काळजी घेतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून जीवन जगण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवून जीवन घडविण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या शैक्षणिक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचेच नव्हे, तर शिस्त, सकारात्मकता, कृतज्ञता, निर्णयक्षमता आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मेहनतीचे महत्त्व समजले.
अॅड. महेश धन्नावत यांचे मत : जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल यांच्या विचारांतून, कार्यशैलीतून आणि यशस्वी वाटचालीतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. त्यांच्या जीवनातील अनुभव, संघर्ष आणि यशाचा प्रवास उलगडणारे पुस्तक त्यांनी लिहावे; ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा अमूल्य स्रोत ठरेल, असे अॅड. महेश धन्नावत यांनी म्हटले.
सीधे अपनी Facebook फ़ीड में पाएँ — News Nation Online पेज को Follow करें।
Discover more from NewsNation Online
Subscribe to get the latest posts sent to your email.











Leave a Reply